आदिवासी वीर रेन्गु कोरकू ही मुंडा ऊर्फ कोलवंशी वन्य जमात महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांत आढळते. सातपुडा पर्वत हे या जमातीचे वसतिस्थान आहे. विदर्भ तसेच होशंगाबाद, निमाड, छिंदवाडा आणि बेतूल या जिल्ह्यांत ही जमात आढळते. कोरु याचा अर्थ माणूस, कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो. कोरकू लोकांचे छोटा नागपूरच्या कोरवा जमातीशी पुष्कळ साम्य आहे. कोरकूंना अनेक मानवशास्त्रज्ञ कोल ऊर्फ मुंडा मानववंशाची एक शाखा समजतात. कोरकूंची सर्वांत मोठी शाखा मवासी या नावाने ओळखली जाते. मवासींची लढवय्येपणाबद्दल व लूटमारी करण्याबद्दल ख्याती आहे.
कोरकूंच्या लग्नात बोरीच्या झाडाचे महत्त्व फार आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरा मुलगा व त्याचे आईबाप बोरीच्या झाडाजवळ जातात. मग भुमका ऊर्फ पुजारी त्यांना दोर गुंडाळून त्या झाडाला बांधून टाकतो. मग एक कोंबडे मारून त्याचे रक्त झाडाच्या मुळाशी शिंपडतो आणि सूर्य व चंद्र यांची प्रार्थना करतो. सूर्य व चंद्र हे कोरकूंचे आद्य पूर्वज व देव आहेत, असे मानले जाते. मग सारे वऱ्हाडी त्या झाडाभोवती नाचतात व गातात. त्यानंतर वर वधूगृही जातो व तिथे लग्न लागते. लग्नात मेढीभोवती वधूवरांनी सात फेरे घालणे हाच मुख्य विधी असतो.
कोरकूंची स्वतंत्र भाषा आहे. त्यांच्या भाषेत देवाला म्हणजे चंद्र-सूर्य यांना गोमज म्हणतात. त्यांचा दुसरा मुख्य देव म्हणजे डोंगर देव व तिसरा देव मुतुआ. मुतुआ देव म्हणजे गाव सीमेवर असलेली दगडांची रास. त्याला प्रतिवर्षी डुक्कर बळी देतात. कोरकूंचे पुजारी दोन प्रकारचे असतात. परिहार व भुमका. हा गावचा खराखुरा पुजारी असतो आणि गावातली सर्व धर्मकृत्ये तोच पार पाडतो. त्यांच्यात मृतांना पुरतात. मृताच्या थडग्याला प्रथम जलांजली देतात. त्याला पितर-मिलोनी असे नाव आहे. पण अखेरचे श्राद्ध करतात त्याला सिडोली असे नाव आहे. सिडोली मृत्यू घडल्यापासून चार महिने ते चार वर्षांपर्यंत केव्हाही करतात. त्यावेळी तागाच्या झाडाला सात वेळा पांढऱ्या दोऱ्याचे वेढे देतात व दारूचा नैवैद्य दाखवितात. मग ते झाड कापून त्याची फांदी आणून त्याचा खांब करतात व त्यांच्यावर चंद्रसूर्याच्या आकृती कोरतात. त्याला मुंडा म्हणतात. त्यांच्यावर कोळी, माणसाचा कान व इतर आकृत्यादेखील चंद्रसूर्यांच्या खाली कोरतात. मृताच्या नावाने या खांबाची प्रतिष्ठापना करतात व गावभोजन देतात. संदर्भ : Russel, R.V; Hiralal; Tribes and Castes of Central Provinces of India, 4 Vols., London, 1916. ```````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````` |
0 Comments