इतिहासात एखाद्या देशाने केलेली सर्वात महागडी चूक कोणती होती?

Header Ads Widget

इतिहासात एखाद्या देशाने केलेली सर्वात महागडी चूक कोणती होती?

      एखाद्या देशाने युद्धात स्वतःचेच सैनिक मारले, ते पण थोडेथोडके नव्हे तर चक्क १०,००० सैनिक, तर त्याला महागडी चूक नक्कीच म्हणता येईल नाही का?

१७८८ साली झालेल्या एका अनोख्या युद्धात ऑस्ट्रियाने गैरसमजामुळे स्वतःच्याच हजारो सैनिकांचा खात्मा केला.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/itihasatilmothichuk.html

१७८७ ते १७९१ ह्या काळात ऑस्ट्रियाचे ओटोमन (तुर्क) साम्राज्याविरोधात युद्ध सुरु होते. ऑस्ट्रियाची फौज हि अनेक प्रदेशातील लोकांची मिळून बनली होती. त्यामध्ये झेक प्रजासत्ताक, जर्मनी, फ्रान्स, क्रोएशिया, सर्बिया, पोलंड आणि ऑस्ट्रियातील सैनिकांचा भरणा होता. प्रत्येकाची भाषा वेगेवेगळी असल्यामुळे ह्या फौजेमध्ये समन्वय साधणे हि एक मोठी समस्या होती.

ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तान ह्या दोन साम्राज्यात डॅन्यूब नदीवर वर्चस्व ठेवण्यासाठी संघर्ष सुरु होता. नदीच्या काठावरील करनसेबेस शहरात काही ऑस्ट्रियन घोडेस्वार रात्रीच्या वेळेला गस्तीचे काम पाहत होते. त्यांना नदीच्या पलीकडे काही भटके लोक छावणीमध्ये पार्टी करताना दिसले. चौकशीसाठी ऑस्ट्रियन सैनिक त्यांच्याजवळ गेले असता त्यांना स्वागत म्हणून दारू देण्यात आली.

काही वेळात सैनिकांचा हा गट दारू पिऊन टुन्न झाला. ऑस्ट्रियन पायदळाची एक टोळी त्याच वाटेने जात होती. त्यांनी मघासाच्या सैनिकांच्या टोळीकडे दारूची मागणी केली पण त्यांनी देण्यास नकार दिला. त्यावरून बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

काही अंतरावर असणाऱ्या सैनिकांच्या टोळ्यांचा असा समज झाला कि तुर्कांनी आक्रमण केले आहे. म्हणून ते 'तुर्क आले, तुर्क आले' असे ओरडू लागले. त्यामुळे दारूसाठी भांडणारे मघासाचे सैनिक भानावर आले. आता ते नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या आपल्या लष्करी तळाकडे लगबगीने पळू लागले.

पण एकंदरीत खूप गोंधळ माजला होता.

लष्करी तळावर असणाऱ्या सैनिकांना काळोखात फौज चालून येताना दिसली. त्यांचा असा समज झाला कि खरोखरच तुर्कांनी आक्रमण केले आहे. म्हणून त्यांनी समोरच्या सैन्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. लागलीच युद्धास सुरुवात झाली.

ह्या गदारोळात जर्मन सैनिक (ऑस्ट्रियाच्या सैन्यातील) 'थांबा, थांबा' म्हणून ओरडत होते पण जर्मन भाषेतील तो शब्द हा तुर्क लोकांच्या युद्धगर्जनेशी मिळताजुळता होता त्यामुळे गोंधळ खूपच वाढला. युद्ध संपेपर्यंत अंदाजे १०,००० सैनिक मृत्युमुखी पडले होते.

पुढे २ दिवसांनी तुर्कांचे सैन्य करनसेबेस शहरावर चालून आले. पण तेथील चित्र बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जिवंत ऑस्ट्रियन सैनिकांशी लढण्याच्या इराद्याने आलेल्या तुर्कांना शहरात सगळीकडे मृत किंवा घायाळ झालेले शत्रुसैनिक दिसत होते. कोणत्याही प्रतिकाराशिवाय तुर्कांनी ती लढाई जिंकली.

स्वतःच्याच सैनिकांना मारण्याच्या ह्या प्रकाराला एक मोठी आणि महागडी चूक म्हणणे योग्य ठरेल असे मला वाटते.

Post a Comment

0 Comments