'थर्ड डिग्री' प्रकार म्हणजे 'थर्ड डिग्री टॉर्चर' होय. थर्ड डिग्री टॉर्चरची कुठे काही मार्गदर्शक तत्वे नाहीत आणि ही एखादी तांत्रिक संज्ञा सुध्दा नाही. थर्ड डिग्री टॉर्चर म्हणजे अमानुषपणे केलेला शारीरिक व मानसिक छळ!
(काल्पनिक चित्र, स्रोत:ललनटॉप) |
'थर्ड डिग्री' शब्द आणि थर्ड डिग्रीचा वापर कशासाठी?
जुन्या काळात अमेरिकेत थॉमस बायर्न्स आणि रिचर्ड सिल्व्हेस्टर हे दोन पोलीस अधिकारी खूप कडक मानले जात होते. यांचे नाव थर्ड डिग्री या शब्दाशी जोडले जाते. सिल्व्हेस्टर यांनी टॉर्चर या प्रकाराला तीन डिग्रीमध्ये विभागले होते. पहिली (फर्स्ट डिग्री) म्हणजे अटक, दुसरी (सेकंड डिग्री) म्हणजे जेलमध्ये आणणे आणि तिसरी (थर्ड डिग्री) म्हणजे चौकशी.
पूर्वी सराईत व अट्टल गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी पोलीस थर्ड डिग्रीचा वापर करत. त्याकाळात मुंबईतही संघटित गुन्हेगारीचे प्रमाण भयंकर होते. दिवसाकाठी हत्या होत असत तसेच खंडणीसाठी अपहरण करणे, धमक्या देणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. अशा प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी हे कसलेले असत. त्यांची आपल्या टोळीवर, म्होरक्यावर प्रचंड निष्ठा असे. त्यांच्याकडून पोलीस तपासात सहजासहजी माहिती मिळत नसे. अशावेळी थर्ड डिग्रीचा वापर करण्याशिवाय पर्यायच नसे. आरोपीच्या शरीरावर एकही ओरखडा न येता छळ करणे, हे कसब होते. एका व्यक्तीला थर्ड डिग्री दिली की त्याची दहशत संपूर्ण टोळीवर बसे. काही प्रकार खालीलप्रमाणे-
कलकत्ता घोडी-
या प्रकारच्या थर्ड डिग्रीत शिकारीनंतर पडलेल्या जनावराचे पाय काठीला बांधून नेतात, तसे आरोपीला बांधले जाते. म्हणून या प्रकाराला 'कलकत्ता घोडी' म्हणतात. अशी व्यवस्था पूर्वी बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये होती. चार-पाच तास सलग बांधून पडल्यानंतर आरोपी स्वतःच्या पायावर उभा राहणे, निव्वळ अशक्य. तेवढ्यावर तो नाही बोलला तर त्याला खाली उतरवून त्याची 'मालीश' होई. त्यानंतर जसा होता तसा करून पुन्हा कलकत्ता घोडी सुरू. कसलेल्या गुन्हेगाराकडून माहिती काढण्यासाठी 'कलकत्ता घोडी' हे हुकमी हत्यार होते.
वन एटी-
(चित्र: मिलीगॅझेटच्या सौजन्याने) |
वन एटी या थर्ड डिग्री प्रकारात आरोपीला जमिनीवर बसवून त्याचे पाय हळूहळू 180 अंशात फाकवायचे. केवळ तेवढ्यावरच काम भागे. कारण ती 'कळ' सोसणे हे खूप कठीण होते. त्याने नाही भागले तर त्याच अवस्थेत आरोपीच्या दोन्ही मांड्यांवर लाकडी फळी ठेवून त्यावर दोन जण उभे राहत. यालाच 'वन एटी' असे संबोधले जात असे.
नालबंदी-
(चित्रस्रोत:मिलीगॅझेट) |
आरोपीला ओणवे झोपवून त्याच्या दोन्ही पायांच्या टाचांवर सत्यशोधक पट्ट्याचे किंवा काठीचे जोरदार फटके मारले जात असत. यानंतर त्याला चालताही येत नसे. तळपायांवर सतत फटके मारण्याच्या या प्रकाराला 'नालबंदी' असा शब्दप्रयोग होता.
सूर्यफुलाचे तेल-
सूर्यफूल तेलाच्या दोन थेंबानी भल्याभल्या गुन्हेगारांना बोलतं केलं जायचं. अंगाची लाहीलाही करणारे दोन थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन 'नेमक्या' जागी चोळले की अवघ्या काही मिनिटांतच परिणाम दिसे.
शॉक ट्रीटमेंट-
(चित्रस्रोत:मिलीगॅझेट) |
शॉक ट्रीटमेंट-या प्रकारात कानांच्या पाळीला विजेचे धक्के दिले जात. त्यासाठी लागणारे खास उपकरण पोलीस बाजारातून विकत घेत. या शॉक ट्रीटमेंटचे टप्पे आहेत. कानाच्या पाळीपासून सुरुवात करून हळूहळू शरीराच्या खालच्या भागापर्यंत विजेचा शॉक दिला जाई.
याशिवाय दिवसभर गोड पदार्थ खाऊ घालून झोपू न देणे, हात वर करून तासनतास उभे ठेवणे, केस उपटणे हेही थर्ड डिग्रीचेच प्रकार होते.
थर्ड डिग्री हत्यारांची अफलातून नावे-
थर्ड डिग्री टॉर्चर करण्यासाठी हत्यारांची किंवा पट्ट्यांची नावे हिंदी चित्रपटाच्या नावांवरून आणि विनोदी अर्थाने ठेवण्यात येतात, असे म्हटले जाते. हे पट्टे लेदरचे असतात. त्यांची अफलातून नावे वाचून आपल्यालाही हसू येईल! काही भागात या हत्यारांना 'समाजसुधारक', 'ज्ञानवर्धक पट्टा', 'आन मिलो सजना', 'रात की रानी', 'राजा', 'फिर कब मिलोगे' अशा विचित्र नावांनी ओळखले जाते.
चित्रस्रोत:अमर उजाला |
हा प्रकार आता अस्तित्वात आहे का?
पोलिसांचा डॉन, गँगस्टर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर दरारा असतो, कारण त्या गुंडांना भीती असते ती एन्काऊंटरची किंवा थर्ड डिग्रीची! आरोपीने केलेल्या गुन्ह्यांचे भरभक्कम पुरावे गोळा करण्याचे काम हे आव्हानात्मक असते. निर्ढावलेल्या गुन्हेगारांना बोलतं करण्यासाठी थर्ड डिग्री वापरावीच लागते, असंही समर्थन केलं जातं.
एखाद्या गुन्ह्याबाबत सामान्य जनतेची आक्रमकता, आंदोलने, राजकीय दबाव यामुळेही पोलिसांवर दबाव वाढतो. यातूनच त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते. थर्ड डिग्रीच्या माध्यमातून झालेल्या मृत्यमुळे यापूर्वी अनेकदा प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत.
तसं बघितलं तर आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक, जीवशास्त्रीय व मानसिक चाचण्या, सीसीटीव्ही कॅमेरा, नार्को टेस्ट, कॉल रेकॉर्ड, फॉरेन्सिक अहवाल यासारख्या अद्ययावत व विविध साधनांच्या मदतीने गुन्हे तपासात मोठी चालना मिळालेली आहे. त्यामुळे आता पूर्वीचे थर्ड डिग्री प्रकार कालबाह्य झाले आहेत. आता मानसिक खच्चीकरण करून आरोपींना बोलते करण्याचा प्रयत्न असतो. तांत्रिक तपासावर भर देण्यात येतो.
कायद्यात थर्ड डिग्री या प्रकाराला मान्यता नाहीच! न्यायालय, मानवाधिकार आयोग यांच्यासह माध्यमांतून वाढता दबाव, गुन्ह्यांचे बदललेले प्रकार अशा विविध कारणांमुळे थर्ड डिग्रीचे प्रकार हळूहळू मागे पडू लागले आहेत किंवा बंद झाले आहेत, असे म्हणता येईल.
0 Comments