भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक कधी कधी शंका येते की, हा तोच भारत देश आहे ना ज्याने शत्रूशी लढता लढता त्यांच्या धरतीवर गेलेल्या 'अभिनंदनला' परत आणण्यासाठी युद्धाची तयारी केली होती?? कारण उभं आयुष्य देशासाठी खर्ची घातलेल्या भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांची ही कहाणी ऐकल्यावर मला तरी हे खरं वाटत नाही.
श्री गंगापूर (राजस्थान) मधील जे. एम. कौशिक हे ब्राह्मण कुटुंब. आई वडील आणि दोन भाऊ. मोठया असलेल्या रवींद्रला अभिनयाची आवड होती. बी.कॉम करत असलेला रवींद्र कॉलेजमध्ये नाटकात आवर्जून भाग घ्यायचा. एकदा थिएटरमध्ये काम करत असताना रॉ (भारतीय गुप्तचर यंत्रणा) च्या एका अधिकाऱ्याची त्याच्यावर नजर पडली. त्याचं काम बघून अधिकाऱ्याने त्याला "देशासाठी काम करशील का?" असं विचारलं, देशभक्त असलेल्या रवींद्रने लगेच होकार दिला.
credit;google |
पाकमध्ये जाऊन रवींद्रने कराची विद्यापीठात एलएलबी ला प्रवेश घेतला. कायद्याचा अभ्यास करत असताना त्याने पेपरमधील जाहिरात बघून सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा दिल्या. आणि लवकरच तो पाकिस्तानच्या सैन्यात भरती झाला. भारताचा मुख्य हेतू साध्य झाला. रवींद्र गुप्तपणे पाक सैन्याच्या हालचालींची माहिती भारताला देऊ लागला.
दरम्यान १९७९ मध्ये त्याने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीमुळे तब्बल २० हजार भारतीय जवानांचे प्राण वाचले. त्याच्या या कामगिरीमुळे इंदिरा गांधी आणि गृहमंत्री एस बी चव्हाण यांनी त्याला 'द ब्लॅक टायगर' हे नाव दिले. पाकमध्ये असताना रवींद्रने सैन्यातील एका अधिकाऱ्याची मुलगी 'अमानत' हिच्याशी विवाह केला. दोघांना एक मुलगी झाली. कालांतराने पाक सैन्यात रवींद्रची पदोन्नती एका प्रमुख पदावर झाली.
१९८३ मध्ये रवींद्रशी संपर्क साधण्यासाठी रॉ ने 'इनायत मसीहा' या गुप्तहेराला पाकिस्तानात पाठवले. पण दुर्दैवाने तो फारसा प्रशिक्षित नसल्याने पकडला गेला. इनायतमुळे रवींद्रही पकडला गेला. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. सियालकोट चौकशी केंद्रावर दोन वर्षे रवींद्रवर अनन्वित अत्याचार केला गेला. पण पाकला त्याला एका झटक्यात मारायचे नव्हते म्हणून की काय, १९९० मध्ये त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. इतकी वर्षे सैन्यात राहिल्याने मित्रत्वाच्या नात्याने एका पाक सैनिकाने त्याची मदत केली. त्याच्या मदतीने रवींद्र त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पत्राद्वारे भारतातील त्याच्या कुटुंबियांना देत असे. "मला होत असलेला त्रास अधिकाऱ्यांना समजावून सांगा" अशा आशयाची अनेक पत्रे त्याने कुटुंबियांना पाठवली होती.
रवींद्रची आई आणि भाऊ त्याच्या सुटकेसाठी रॉ च्या अनेक अधिकाऱ्यांना भेटले. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, जसवंतसिंह यांसारख्या नेत्यांना पत्रे पाठवली. पण कोणतेही अधिकारी आणि नेते त्यांची मदत करू शकले नाही. रवींद्रला सोडवण्यासाठी भारताकडून युद्ध पातळीवर कोणतेच प्रयत्न झाले नाही. अखेर उद्विग्न होऊन रवींद्रने त्याच्या एका पत्रात लिहिले की,
जर मी अमेरिकन असतो तर तीन दिवसात तुरुंगातून बाहेर पडलो असतो.
दुसऱ्या एका पत्रात त्याने लिहिले,
भारतासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देऊन एखाद्याला हे बक्षीस मिळते काय?
रवींद्र १९८३ ते २००१ म्हणजे अठरा वर्षे पाकिस्तानचा कैदी म्हणून राहिला. अखेर २१ नोव्हेंबर, २००१ मध्ये टीबी आणि नंतर हृदयविकाराच्या आजाराने तुरुंगातच त्याचं निधन झाले. त्याचं शवही भारतात आणलं गेलं नाही. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून हृदयविकाराच्या धक्क्याने त्याच्या वडीलांचेही निधन झाले.
रवींद्रची आई 'आमलादेवी' यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की,
जर तो पकडला गेला नसता तर आतापर्यंत पाक सैन्यात वरिष्ठ अधिकारी बनला असता आणि गुप्तपणे देशाची सेवा करत राहिला असता.
२०१२ मध्ये आलेला सलमान खानचा 'एक था टायगर' या सिनेमाची कथा रवींद्रच्या जीवनावर आधारित होती. रवींद्रचे पुतणे विक्रम यांनी मागणी करूनही याचे श्रेय रवींद्रच्या कुटुंबाला देण्यात आले नाही. २०१९ मधील 'रोमियो अकबर वॉल्टर' हा सिनेमाही रवींद्र कौशिकच्या जीवनावर आधारित आहे.
रवींद्र कौशिक जगातील यशस्वी हेर यासाठी आहेत कारण ते स्वतःच्या नाही तर सहकाऱ्याच्या चुकीमुळे पकडले गेले होते. तसं झालं नसतं तर कदाचित अजूनही ते पाकिस्तानात राहून गुप्तपणे आपल्या देशाची सेवा करत असते. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून त्यांच्या देशात जाऊन सैन्यात भरती होऊन तिथून आपल्या देशाला गुप्तपणे माहिती देण्याची हिंमत फक्त एक भारतीयच करू शकतो.
जय हिंद.
0 Comments