तिचं लहानपण तितकंसं सुखावह नव्हतं. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता आणि तिच्या आईचादेखील मृत्यू झाला होता. तीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. ती बालवाडी शिक्षिकेचे प्रशिक्षण घेत होती पण तिथे हेडमास्तरांनी तिच्यासोबत अतिप्रसंग करायचा प्रयत्न केल्याने तिला ती शाळाही सोडावी लागली. अशातच तिनं १८व्या वर्षी वर्तमानपत्रात आलेल्या एका लग्नाच्या जाहिरातीला उत्तर देऊन रुडॉल्फ मॅकलॉड नावाच्या एका डच अधिकाऱ्याशी लग्न केले. या लग्नामुळे तिचा उच्चभ्रू डच वर्तुळात प्रवेश झाला आणि ती पूर्व जावा बेटांवरच्या शहरात राहायला गेली.
हा तिचा नवरा चांगलाच श्रीमंत होता. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली होती. पण त्यापलिकडे या लग्नात काही सुखावह नव्हतं. नवरा प्रचंड संशयी आणि दारूडा होता. तिच्यापेक्षा तो वीस वर्षांनी मोठा होता आणि सतत मारहाणही करत असे. शेवटी या सर्व जाचाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. पण या सगळ्या प्रकरणात तिचा मुलगा आजारी पडून वारला. मुलीची कस्टडी मिळाली पण नवऱ्याने आर्थिक मदत न केल्याने तिला उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे भाग पडले. हे सगळं तिच्यासोबत घडलं नसतं तर ती कदाचित गुप्तहेर बनलीही नसती.या जावा बेटांवर मात्र मार्गारेटने इंडोनेशियन परंपरांचा चांगलाच अभ्यास केला होता. तिथे ती जावा बेटांवरचं नृत्यही शिकली होती. याचा फायदा तिनं पुढच्या आयुष्यात स्वत:ला भारतीय, जावा आणि कुठल्या-कुठल्या वंशाची म्हणवून घेण्यासाठी करून घेतला. तिनं तिचं माता हारी हे नाव मलाया भाषेतूनच घेतलं होतं. मलाया भाषेत त्याचा अर्थ होतो- सूर्य!!
लग्न मोडल्यानंतर तिनं चरितार्थासाठी डान्स प्रोग्राम करायला सुरूवात केली. अतिशय सुंदर, शब्दाची पक्की, मादक बोलणारी, शरीरप्रदर्शन करण्यास कां कू न करणारी असल्याने ती लवकरच प्रसिद्ध झाली. जावा बेटावरची हिंदू वंशाची राजकुमारी असल्याची ती सगळीकडे ओळख सांगत असे. नृत्य करतकरत अंगावरचे कपडे काढण्याची तिची पद्धत तुफान हिट झाली होती. अर्थात ती पूर्णपणे नग्न होऊन कधीच तिच्या प्रेक्षकांसमोर आली नाही. ब्रेस्टप्लेट्स आणि गळ्यात-डोक्यावर काही दागिने अशा वेशभूषेत तिच्या नाचाची सांगता होत असे. यामुळेच तिच्या कार्यक्रमांचं तिकीट सामान्यांना परवडणारं नसे.
हळूहळू तिचं वय झालं, तिच्यासारखं नृत्य करणाऱ्या इतर स्त्रिया आल्या, माता हारीचं वयोमानपरत्वे वजन वाढू लागलं, पण तरीही तिची लोकप्रियता कायम राहिली. ती तोवर यशस्वी गणिका झाली होती आणि सौंदर्यापेक्षा ती तिच्या कामुकता, प्रणय आणि मादकतेसाठी ओळखली जायची. तिचा शेवटचा नृत्याचा कार्यक्रम १९१५ला झाला असं सांगितलं जातं. या नृत्यांगना असण्याचा काळात तिच्या ओळखी विविध शाखांमधल्या वरिष्ठ सैन्यअधिकारी, मोठे राजकारणी आणि इतर मोठ्या लोकांसोबत झाल्या होत्या. या सामर्थ्यशाली लोकांमुळे ती एका देशातून दुसरीकडे सहज जात असे. पहिलं महायुद्ध सुरु होईपर्यंत ती एक मनस्वी कलाकार म्हणून ओळखली जात असे, नंतर मात्र बेलगाम पण दिल्या शब्दांची पक्की आणि एक धोकादायक मदनिका म्हणून तिच्याकडे पाह्यलं जाऊ लागलं. या सगळ्याचा शेवट तिने हेरगिरी करण्यात झाला.महायुद्धादरम्यान तिची जन्मभूमी असलेला नेदरलँडस देश तटस्थ होता. साहजिकच माता हारी सहज परदेशवाऱ्या करत असे. यादरम्यान ती कॅप्टन मास्लोव्ह या फ्रान्ससोबत काम करणाऱ्या रशियन वैमानिकाच्या प्रेमात पडली होती. १९१६मध्ये हा मास्लोव्ह जर्मन लोकांसोबतच्या चकमकीत जखमी झाला आणि त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. त्याला भेटण्यासाठी माता हारीने युद्धभूमीवरच्या इस्पितळात जाण्याची परवानगी मागितली. तटस्थ देशाची नगरिक असल्याने तिला ही परवानगी मिळाली नाही, परंतु फ्रान्ससाठी हेरगिरी करण्यास ती तयार असेल तर परवानगी मिळेल असं तिला सांगण्यात आलं. युद्धापूर्वी जर्मन राजकुमारासमोर तिने नृत्याचे कार्यक्रम केले असल्याने तिचा जर्मन गोटात सहज शिरकाव होईल आणि आपल्या मादक सौंदर्याने ती हवी ती गुप्त माहितीही मिळवू शकेल असा फ्रेंच अधिकाऱ्यांचा कयास होता.प्रत्यक्षात या जर्मन राजकुमाराचा युद्धात खूप कमी सहभाग होता आणि त्याला सर्वांसमोर पराक्रमी-मुत्सद्दी म्हणून सादर केले जात असले तरी मुळात तो मदिरा-मदिराक्षींमध्ये गुंतलेला विलासी माणूस होता. त्याला रणनीतीची अजिबातच माहिती नव्हती. फ्रेंच अधिकाऱ्यांनी या राजकुमाराकडून जर्मन युद्धनीतीची माहिती मिळवून देण्यासाठी दहा लाख फ्रँक्सची माता हारीला ऑफर दिली गेली होती. पण या बाई अतिहुशार निघाल्या. राजकुमारासोबत भेट घडवून देणाऱ्या अधिकाऱ्याने उलट प्रस्ताव ठेवताच तिने फ्रान्सची गुपितं जर्मनीला विकण्याचं कबूल केलं. थोडक्यात, माता हारी डबल एजंट झाली. आणि सुरू झाला तिचा डबल हेरगिरीचा प्रवास!!! फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेऊन त्यांच्याकडील महत्वाची माहिती काढून घेणे हे तिचे काम. तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर फिदा झालेले फ्रान्सचे अधिकारी तिला कशासाठी नाही म्हणणे शक्यच नव्हते. हळूहळू कित्येक गोष्टी तीने जर्मन सैन्याला कळवल्या.
माता हारीच हेरगिरी करत असल्याचे पुरेसे पुरावे फ्रान्सकडे नव्हते. मात्र युद्धात झालेल्या पराभवाने चिडलेल्या फ्रान्सने तिला डबल एजंट म्हणत दोषी ठरवले. पुरावा म्हणून तिच्या मेकअप कीटमधली एक खास शाई सादर केली गेली. तिच्यावर खटला भरला. ५०,००० सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला. जन्माने डच असूनही जावा राजकुमारी असण्याचा खोटा देखावा करणं तिच्याविरुद्धचा पुरावा समजण्यात आला. १९१७साली तिला १२ फ्रेंच सैनिकांकडून गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. त्यावेळी ती अवघ्या ४१ वर्षांची होती. मरतानाही तिने बुरखा घालायला नकार दिला आणि तिला गोळ्या घालणाऱ्या सैनिकांकडे पाहून तिनं हवेत चुंबन फेकलं होतं. असामान्य सौंदर्याची धनी असलेली माता हारी अशाप्रकारे ऐन तारुण्यात मारली गेली. तिच्याबद्दल सांगितले जाते की जर तिने पैशांची अतिलोभ दाखवले नसते तरी एक डान्सर म्हणून ती अजरामर ठरली असती. तिच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी, म्हणजेच २०१७मध्ये फ्रान्स सैन्यदलाने तिचा खटला आणि त्या अनुषंगाने असलेली कागदपत्रे खुली केली
0 Comments